राज महाराष्ट्र टाइम्स.
*स्वाभिमानी शेतकरी संघटना, फलटण तालुका*
*दिनांक: ९/१०/२०२६*
*फलटण तालुक्यात दुष्काळ जाहीर पण प्रत्यक्षात दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या - स्वाभिमानीची आक्रमक मागणी*
फलटण : फलटण तालुक्यामध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अजून कोणताही दिलासा मिळालेला नाही. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पेरणी झाल्यानंतर पावसाने दीर्घ दडी मारल्याने पिके पूर्णपणे जळून गेलेली आहेत. सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, कांदा, ऊस या पिकांचे ७०% पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
विशेष म्हणजे फलटण तालुक्यात काही भागात पिके वरून हिरवी दिसत असली तरी जमिनीत ओलावा संपल्यामुळे आणि पाण्याअभावी त्या पिकामध्ये दाणे भरण्याची, उत्पन्न देण्याची क्षमता अजिबात राहिलेली नाही. फलटण तालुक्यात सरासरी ७०% पिकांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी १००% नुकसान झाले आहे. त्यामुळे केवळ दोन-चार गावामध्ये पंचनामा करून अहवाल पाठविणे हा शेतकऱ्यांवर अन्याय ठरेल, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे.
या संदर्भात आज दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फलटणचे तहसीलदार अभिजित जाधव यांना निवेदन दिले. या निवेदनामध्ये खालील प्रमुख ८ मागण्या करण्यात आल्या आहेत.
*प्रमुख मागण्या -*
*१)* प्रत्येक गावात आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधारवर जाऊन सरसकट पंचनामे करण्यात यावे.
*२)* पंचनाम्यामध्ये फक्त जळालेली पिकेच नाहीतर हिरवी दिसणाऱ्या पिकांचाही पंचनामा करण्यात यावा. कारण हिरवी दिसणारी पिके पाण्याअभावी ७०% नुकसानग्रस्त झालेली आहेत.
*३)* दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी भरघोस मदत जाहीर करावी.
*४)* शेतसारा / कृषी पंपाचे लाईट बिल आणि मुलांची शैक्षणिक फी पूर्ण माफ करावी.
*५)* राज्यातील आमदार, खासदार, मंत्री यांचे दरमहिन्याचे पगार बंद करून तो निधी राज्यातील शेतकऱ्यांच्या योजनांसाठी द्यावा.
*६)* माजी आमदार, खासदार यांचे दरमहा पेन्शन बंद करून तो फंड दुष्काळग्रस्त योजनांसाठी देण्यात यावा.
*७)* जनावरांसाठी पाणी व चाऱ्याची सोय करावी, तसेच सिंचन व जलसंधारणाचे दीर्घकालीन नियोजन करावे.
*८)* मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांची पिकपाणी केली असता ती सातबारावरती दिसत नाही, ती पिकपाणी त्वरीत ४८ तासात सातबारावर दाखवावी.
वरील मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकऱ्यांना तात्काळ पिकांचे सरसकट पंचनामे करून दुष्काळात भरघोस मदत देऊन न्याय द्यावा, अन्यथा शेतकरी स्वाभिमानी संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर
नितीन यादव
फलटण तालुका अध्यक्ष
प्रमोद गाडे
युवक राज्य प्रवक्ते
डॉक्टर रवींद्र घाडगे
जिल्हा सरचिटणीस
विक्रम पवार
शहराध्यक्ष
किसन शिंदे
बाबा कोकरे
इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते